चिराग यांच्यावर प्रथमच भाजपचा थेट शाब्दिक हल्ला

लोजप संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप

नवी दिल्ली –बिहारमधील सत्तारूढ एनडीएतून बाहेर पडलेल्या लोकजनशक्ती पक्षावर (लोजप) आणि त्या पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर भाजपने प्रथमच थेट शाब्दिक हल्ला चढवला आहे. आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेल्या चिराग यांच्या संबंधांचा आधार घेऊन लोजप संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच लोजपच्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या सस्पेन्समुळे प्रामुख्याने भाजपची गोची झाली आहे. बिहारमध्ये एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या जेडीयूशी पंगा घेऊन लोजपने ती आघाडी सोडली.

मात्र, त्या पक्षाकडून भाजपवर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. एवढेच नव्हे तर, निवडणुकीनंतर भाजपबरोबर आम्ही सरकार स्थापन करू, असा विश्‍वासही लोजपकडून व्यक्‍त केला जात आहे. त्यामुळे जेडीयूला रोखून मोठा पक्ष बनण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपकडून लोजपचा वापर केला जात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातून भाजप आणि जेडीयूमध्ये संशयाचा भडका उडण्याची शक्‍यता बळावली आहे.

त्यातून भाजपने प्रथमच लोजपवर जाहीर निशाणा साधला. लोजपशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. संभ्रम फैलावण्याचे राजकारण भाजपला मान्य नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले. लोजप हा केवळ इतरांची मते खाणारा पक्ष आहे. त्या पक्षाचा निवडणुकीत फारसा प्रभाव पडणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव यांनीही चिराग यांच्यावर खोटारडेपणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. भाजप आणि लोजपमध्ये छुपा समझोता झाल्याचे चित्र दूर करण्यासाठी भाजपने लोजपवर शाब्दिक हल्लाबोल केल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.