पुणे -देशात उसापासून इथेनॉल तयार करण्यासोबतच अन्य पिकांचाही पर्याय समोर येत आहे. या सर्वांमध्ये मका हे पीक आघाडीवर असून, त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होत आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या “मका संमेलनात’ही चर्चा करण्यात आली. इथेनॉल उत्पादन आणि पोल्ट्री उद्योगाची वाढती मागणी पूर्ण करायची असेल, तर पुढील पाच वर्षांत मक्याचे उत्पादन 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्टही केंद्रीय कृषी विभागाने ठेवले आहे. मक्याचा वापर राज्यात इथेनॉल तयार करण्यासाठी करता येणार असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. शिवाय, ऊस पिकावरील अवलंबित्व कमी होऊन पाण्याचा वापरही कमी होणार आहे.
बिहारमध्ये यशस्वी उत्पादन
काही दिवसांपूर्वीच बिहारममध्ये मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मोतीपूर प्रखंड येथे मक्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सन 2021 मध्ये देशाचे इथेनॉल धोरण तयार झाल्यानंतर, हा देशातील पहिला सर्वात वेगवान निर्माण झालेला प्रकल्प आहे. येथे 280 टन मका कच्चा माल म्हणून वापर दररोज 1 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन होत असून, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे 5 हजार लोकांना रोजगार मिळत आहे.
महाराष्ट्र चौथ्या स्थानी
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कृषी उत्पादक राज्य आहे. येथील मुख्य पिकांमध्ये मक्याचाही समावेश होतो. यात बहुतांश मका उत्पादन हे संकरित वाणांचे आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर बिहारचा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण मका उत्पादनात एकट्या महाराष्ट्राचा वाटा सुमारे 10 टक्के आहे.
केंद्र सरकार सकारात्मक
काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या भारत मका परिषदेत केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी मका उत्पादन आणि इथेनॉल याबाबत केंद्र सरकारची भूमिका मांडत इथेनॉल निर्मितीत सरकारचे प्राधान्य असल्याचे सांगितले.
ज्या खासगी कंपन्या महाराष्ट्रात मका मूल्य साखळी आणि इथेनॉल उत्पादनात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांना राज्य सरकार मदत करेल. खासगी कंपन्यांनी राज्यात मक्याची गोदामे स्थापन करावीत. ज्यामुळे मका उत्पादकांना त्यांचा साठा साठवून ठेवता येईल आणि नंतर भाव चांगला असेल तेव्हा विक्री करता येईल.
– अब्दुल सत्तार, कृषीमंत्री, महाराष्ट्र
सध्या मका उत्पादन 33-34 मेट्रिक टन आहे. इथेनॉल आणि पोल्ट्री उद्योगाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुढील पाच वर्षांत मक्याचे प्रमाण 44-45 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची गरज आहे.
– मनोज आहुजा, केंद्रीय कृषी सचिव
पोल्ट्री उद्योगासमोर चिंता
इथेनॉल तयार करण्यासाठी मका तिकडे वळवला जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासमोर कोंबड्यांसाठी खाद्यान्नाची नवी चिंता उभी राहिली आहे. येत्या काळात कोंबड्यांच्या खाद्य उत्पादनासाठी मक्याच्या कमी उपलब्धतेबद्दल चिंता वाटते.
मका पिकाचे अन्य उपयोग
ब्रेड, लाह्या, स्टार्च, अल्कोहोल, ऍसिटिक व लॅक्टिक ऍसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरिता होतो
महाराष्ट्राचे वातावरण पूरक
मका हे उष्ण समशीतोष्ण आणि थंड हवामानात येणारे पीक आहे. या पिकाच्या वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सियस तापमान चांगले असते. परंतु जेथे सौम्य तापमान 20 ते 30 अंश सेल्सियस आहे, अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. त्यामुळे महाराष्ट्रात तीनही ऋतुंमध्ये मक्याचे उत्पादन चांगले होते.