पुणे – महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा (जेजुरी) आणि अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगाव) तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या पीएमआरडीए क्षेत्रातील विविध धार्मिक-तीर्थस्थळांचे दर्शन व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी बससेवा 1 मेपासून सुरू होत आहे. दर शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. त्यांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होण्यासाठी पीएमपीच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व 16व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी वातानुकूलित ई-बस प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी यासह सार्वजनिक सुटीदिवशी सुरू करण्यात येत आहे.
पर्यटन बसचा मार्ग आणि कंसात प्रवासभाडे
मार्ग क्र. 1 : वेळ सकाळी 9.00
हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर. (1 हजार रुपये प्रतिव्यक्ती)
मार्ग क्र. 2 : वेळ सकाळी 9.00
मार्ग – हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर. (1 हजार रुपये प्रतिव्यक्ती)
मार्ग क्र. 3 : वेळ सकाळी 9.00
मार्ग – डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन. (1 हजार रुपये प्रतिव्यक्ती)
मार्ग क्र. 4 : वेळ सकाळी 9.00
मार्ग – पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन. (1 हजार रुपये प्रतिव्यक्ती)
मार्ग क्र. 5 : वेळ सकाळी 9.00
मार्ग – पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन. (700 रुपये प्रतिव्यक्ती)
मार्ग क्र. 6 : वेळ सकाळी 9.00
मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन. (1 हजार रुपये प्रतिव्यक्ती)
मार्ग क्र. 7 : वेळ सकाळी 9.00
मार्ग – भक्ती-शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी. (700 रुपये प्रतिव्यक्ती)
सवलत आणि बुकिंग कसे करणार…
बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण 33 प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास 5 प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये 100 टक्के सवलत देण्यात येणार आहे. डेक्कन, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन येथे या बससेवेचे तिकीट बुकिंग करता येईल. बुकिंग असेल त्या दिवशी त्या प्रवासासाठी राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत त्याच तिकिटावर अन्य पीएमपीच्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे.