सकारात्मक बातम्या येण्यास सुरुवात

राज्यात करोनाची लाट ओसरत असल्याचे संकेत

ठाणे  -ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ व बदलापूरमध्ये दररोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली असून, यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अंबरनाथ शहरात 1 एप्रिल रोजी 172 नवे रुग्ण आढळले होते. तर 1 मे रोजी हा आकडा 132 वर आला. तसेच 10 मे रोजी हाच आकडा अवघ्या 53 वर आला. बदलापूरमध्येही 1 एप्रिल रोजी 177 नवे रुग्ण आढळले होते. 1 मे रोजी ही संख्या 148 इतकी होती. तर 10 मे रोजी ही संख्या 57 वर आली. त्यामुळे या दोन्ही शहरातली रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचे पाहायला मिळत असून दुसरी लाट ओसरत असल्याचे हे सकारात्मक चित्र असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान, अंबरनाथ, बदलापूरजवळ असलेल्या कल्याण डोंबिवली शहरात करोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. दररोज शेकडो नागरिकांना अद्यापही करोनाची बाधा होत आहे. याशिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत कल्याण डोंबिवलीतही रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसते आहे. कल्याण डोंबिवलीतील रुग्णसंख्या ही दिवसाला 2 हजारांच्या पार गेली होती. रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते. सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर संसर्ग रोखण्यात यश येताना दिसते आहे.

मुंबईतही रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत आठ ते अकरा हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळत होते. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, ही रुग्णसंख्या घटवण्यात मुंबई महापालिका प्रशासनाला यश आले आहे. मुंबईत सध्या दिवसाला एक ते तीन हजाराच्या आत नवे करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

=============

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.