पुणे – घाबरू नका, लहान मुलेही बरी होतात

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृतीची गरज

-महापौरांसह ऑनलाइन बैठक : बालरोग तज्ज्ञांनी दिले सहकार्याचे आश्‍वासन
-त्रास जाणवल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करा

पुणे  -“लहान मुलांमध्ये करोनाची तीव्रता कमी असते. त्यांना बाधा झाल्यास तो लवकर बराही होतो. यामुळे पालकांनी घाबरू नये. मात्र, यासाठी अधिक जनजागृतीची गरज आहे,’ असे मत मंगळवारी बालरोग तज्ज्ञांनी मांडले. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले अधिक बाधित होऊ शकतात, यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना शहरातील बालरोग तज्ज्ञ सर्वतोपरी सहकार्य करतील, असे आश्‍वासनही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून लहानमुलांसाठी “टास्क फोर्स’ स्थापन करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. मोहोळ यांनी बालरोग तज्ज्ञांशी मंगळवारी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी तज्ज्ञांनी विविध सूचना केल्या आणि सहकार्य करण्याचे आश्‍वासनही दिले. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने या पार्श्‍वभूमीवर येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात 200 बेडची सुविधा असलेले स्वतंत्र कोविड कक्ष उभारण्याला सुरूवात केली आहे.
“करोनाबाधित मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप एवढीच लक्षणे आढळून आली आहेत. मोठ्यांच्या तुलनेत मुलांना फारसा त्रास झाल्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत. लहान मुले पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्रास जाणवू लागल्यास तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचारावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

पुणे शहरामध्ये लहान मुलांसाठीची 10 ते 12 रुग्णालये आहेत. परदेशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्याकडेही ऑक्‍टोबरनंतर लहान मुलांच्या लसीकरणाचा अभ्यास होऊन मार्च 2022 पर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध होईल, अशी शक्‍यता आहे,’ असे डॉ. संजय ललवाणी यांनी सांगितले.

करोना बाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण मागीलवर्षी जेवढे होते तेवढेच आहे. त्यामुळे पालकांनी घाबरण्याचे कारण नाही. ससूनमध्येही लहान मुलांवरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्‍यक साहित्य, सामग्रीची मागवत आहोत. औषधोपचारासाठी ससूनने “प्रोटोकॉल’ तयार केला आहे. ग्रामीण भागातून पुण्यामध्ये उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने निश्‍चितच यंत्रणा तयार करावी लागणार आहे.
– डॉ. आरती किणीकर,बालरोगतज्ज्ञ, ससून हॉस्पिटल

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये फेब्रुवारी ते मेदरम्यान अडीच लाख रुग्ण आढळून आले. याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आल्याने फार धावपळ झाली, ही वस्तुस्थिती आहे. लहान मुलांना करोनाची लागण ही पालकांच्यादृष्टीने संवेदनशील बाब आहे. यामुळेच तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. शहरातील बालरोग तज्ज्ञांची संघटना आणि सर्व सदस्य यासाठी महापालिकेला निश्‍चितच सहकार्य करतील. यासाठी तज्ज्ञांचा “टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येईल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.