पुणे – विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा असणार आहेत. यामध्ये मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा करण्यात येणार आहेत.
मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. यापूर्वी रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची उपलब्धता, मदतकक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करून 15 प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा देण्याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
मतदारांच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. हे विद्यार्थी मतदार रांगेचे व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करतील.