पिंपरी, (प्रतिनिधी) – म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र, अनपेक्षितपणे राष्ट्रवादीकडून मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे आढळराव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
त्यामुळे शिरूर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स आता दूर झाला आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे शिरूर लोकसभेतील राजकीय समीकरणे मात्र वेगाने बदलली आहेत. परंतु हे सर्व घडत असताना भोसरीतील राजकीय मंडळींची भलतीच बोळवण होताना दिसत आहे.
गेली अनेक आठवडे शिरूर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच आढळराव यांनी उमेदवारीसाठी मतदारसंघात पुन्हा पोस्टर्स लावत, मीदेखील इच्छूक असल्याचे जाहीर केले.
मी शिरूर लोकसभा निवडणुक लढविणारच, अशी आग्रही भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात त्यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांना शिरूर लोकसभा निवडणूक लढविण्यापासून दूर करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. सुरुवातीला आग्रही असलेले आढळराव या नियुक्तीनंतर, पदभार स्विकारताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचे शिरूर लोकसभेतील आव्हान संपुष्टात आल्याचा सर्वांचाच समज झाला.
दरम्यान, शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे खुले आव्हान अजित पवारांनी दिले आणि त्याच दिवसापासून या मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या. महायुतीत याच मतदार संघासाठी रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळाला.
दोन दिवसांनी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि याच मतदार संघातील महत्वाचे नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदार संघावरुन खलबते झाली. त्यानंतर आढळरावांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आतापर्यंत युतीत अनेकदा उमेदवारांची देवाण घेवाण सुरु राहते. यापूर्वी राज्यात अशा प्रकारच्या देवाण घेवाण झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लढले आहेत आणि त्यांच्या चिन्हावर देखील लढले आहेत. त्यामुळे तसे आदेश मला देण्यात आले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमी मला तसे सांगितेले तर त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
पवार कुटुंबीयांमुळे चर्चांना उधाण
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदार संघामधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. त्याकरिता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी या मतदार संघातील कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली होती. त्यामुळे पार्थ पवारकडे शिरूरचा भावी उमेदवार म्हणून पाहिले जात होते. मात्र, दोन दिवसांतील घडामोडींनी शिरूरमधील राजकीय चित्र पूर्णत: बदलले आहे.
महत्त्वाकांक्षांची घुसमट
देशभरात काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. परंतु शिरुर लोकसभा मतदारसंघात मात्र दोन ते अडीच वर्षांपासून भोसरीमधील नेते मंडळी दंड थोपटत आहेत. आमदार महेश लांडगे भाजपकडून तर माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून इच्छुक असल्याचे दिसून येत होते. मागील लोकसभा निवडणुकीतच विलास लांडे यांनी जोरदार तयारी केली होती.
परंतु त्यांना थांबवत डाॅ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने तिकीट दिले होते. यंदा तरी आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा विलास लांडे यांना होती. अनेक कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत दिसणारे विलास लांडे अचानकच चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवारांकडे जाऊन पोहचले. केवळ पोहचलेच नाहीतर आपल्या भाषणातून जोरदार स्तुती करत किल्ले पुन्हा जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला. भोसरीमधील या दोन्ही नेत्यांची या लोकसभा निवडणुकीत तरी किमान महत्त्वाकांक्षा पूर्ण होताना दिसत नाही.