लातूर – दारूच्या आहारी गेलेल्या आपल्या लहानभावाने शेतात झाडाला गळफास घेतल्याचाबनाव रचत पोलिस ठाण्यात अकस्मातमृत्यूची नोंद करण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावावर देह बोलीवरून पोलिसांना संशय आला. त्यानेच भावाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
याप्रकरणी औसा पोलिसांत आई व मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून आई शशिकला बालाजी जाधव (४७) आणि मुलगा सचिन बालाजी जाधव (२६) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. औसा तालुक्यातील तुंगी (बु) येथील सचिन बालाजी जाधव हा तरुण औसा पोलिस ठाण्यात आला आणि आपला लहानभाऊ योगेश (२३) याने शेतातील पत्र्याच्या शेडला गळफास घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली, परंतु त्याची देहबोली (बॉडी लँग्वेज) संशयास्पद वाटू लागल्यामुळे त्याला उलटसवाल करत या संदर्भात माहिती विचारली. यात तो गडबडला आणि भावाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे प्रेत मीच खाली काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ गाठत स्पॉट पंचनामा केला आणि त्यांची शंका आणखी बळावली. कारण आत्महत्या केलेली जागा आणि मृतदेह ठेवलेली जागा वेगवेगळ्या होत्या. पोलिसांनी आपल्या स्टाइलने चौकशी सुरू करताच आरोपी सचिन जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली. दारू प्राशन करून लहान भाऊ घरातसर्वांना त्रास देत असल्यामुळे सर्व त्याला वैतागले होते. शनिवारी रात्री १० ते १०.३०वाजेच्या सुमारास तो पुन्हा घरात आला आणि त्याने पैशासाठी वाद सुरू केला. यावेळी आई शशिकला बालाजी जाधव(४७) व मोठा मुलगा सचिन यांनी मिळून दारूच्या नशेत असलेल्या योगेश याला शेतात नेले आणि आईच्या मदतीने सचिनने याेगेशचा दोरीने गळा आवळून खून केला होता, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.