Prakash Ambedkar – छगन भुजबळ ओबीसींच्या बाजूने भूमिका घेत आहेत. पण ते सत्तेत देखील आहेत. ते मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाहीत, असा सवाल देखील वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत आमची युती आहे. पण, उद्धव ठाकरे कोणाला भितात हे माहित नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. महाविकास आघाडीकडून आम्हाला बैठकीचे आमंत्रण आले आहे. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आमच्या पक्षाचे प्रतिनिधी जाणार असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.
आंबेडकर पुढे म्हणाले की, मी कुठल्या ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत नाही. कोणाची हकालपट्टी करा ही माझी भूमिका नाही. कोण त्यांच्या उपयोगात आहे आणि कोण नाही हे ज्या त्या पक्षांनी त्यांचे ठरवावे.
महाविकास आघाडी सोबत चर्चा करण्याचे निमंत्रण आले आहे. उद्या आम्ही चर्चा करायला जाणार आहोत. मात्र मी न जाता आमच्या पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण संदर्भात निघालेल्या अध्यादेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे मोठे नेते झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजप आता ओबीसीमधून बाद झाले आहेत, अशी परिस्थिती असून त्यांच्यातील भांडणे लवकरच बाहेर येतील, असेही आंबेडकर म्हणाले.