वाल्हे -करोनाच्या कामात सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष देण्यास संबंधित यंत्रणेला वेळ नाही. परिणामी, वाल्हे दूरक्षेत्रातील पोलिसांनी पोलीस मित्रांच्या मदतीने फावडे, घमेले घेऊन वाल्हे ते पिसुर्टी फाट्यापर्यंतचे चार ते पाच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक आदर्श घडविला आहे.
पुणे – पंढरपूर पालखी महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वर्ग झाला आहे. या महामार्गाकडे प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. दरवर्षी महामार्गावरून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होतो.पुणे- पंढरपूर महामार्गावरील खड्डे, साईडपट्टी भरून घेतली जाते. मात्र, यंदा करोनामुळे पालखी सोहळे रद्द केले होते. त्यामुळे खड्डे व साईडपट्टी भरली नाही.
या ठिकाणी अपघाताची शक्यता लक्षात घेत जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे दूरक्षेत्रातील हवालदार हनुमंत गार्डी, बी. व्ही. जगदाळे, समीर हिरगुडे यांनी पोलीस मित्र तानाजी भुजबळ यांच्या मदतीने चार ते पाच किलोमीटर अंतरावरील खड्डे बुजविले आहेत. साइडपट्टी मुरूम टाकून भरून घेतली. या कामासाठी जेसीबी व ट्रॅक्टर चालक निखिल पवार, अंकुश बरकडे, अनिकेत भुजबळ यांनीही सहकार्य केले.