अकरावी प्रवेश : 72 हजार 721 विद्यार्थ्यांनी भरला भाग-2
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत 72 हजार 721 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 भरून कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. त्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
1 जुलैपासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी करत 1 लाख 6 हजार 972 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. 22 जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यात आतापर्यंत 98 हजार 895 विद्यार्थ्यांनी नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळविला आहे. 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी सुविधा सुरू करण्यात आली. त्यांतर्गत 81 हजार 515 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यातील 81 हजार 53 अर्जांची तपासणीही पूर्ण झाली आहे. इन हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यांतर्गत एकूण 5 हजार 746 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
12 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-2 भरता येऊ लागला आहे. अद्यापही नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आढळून येत नाही. यात 74 हजार 724 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यातील 71 हजार 778 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉकही केले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार आहे. त्याची मुदत संपणार नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विचार करण्यात येणार आहे, असे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले.
हरकती नोंदविण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत
तात्पुरत्या किंवा संभाव्य गुणवत्ता यादीत सर्व पात्र विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या गुणवत्ता यादीवर ऑनलाइन आक्षेप किंवा हरकती नोंदविण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन प्राप्त झालेल्या आक्षेपांचे संकलन करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करण्यासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.