कानपूर – पीयूष जैन याच्या घरात घबाड सापडल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपावर हल्लाबोल केला आहे. कानपूरमध्ये सर्वांनी नोटांचा डोंगर पाहिला. आता यावर समाजवादी पार्टीचे मौन का आहे? असा सवाल मोदी यांनी केला आहे.
कानपूरच्या निराला नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनसभा पार पडली. काही दिवसांपूर्वी बॉक्स भरून भरून नोटा सापडल्या. आता हे लोक म्हणतील आम्हीच हे केले, असा टोला लगावतानाच मागच्या सरकारने भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते सर्व बाहेर आलं आहे. आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कानपूरमध्ये सापडलेल्या घबाडावरून समाजवादी पार्टीवर जोरदार हल्ला केला होता. आज समाजवादी पार्टीची बोबडी वळली आहे. कारण त्यांच्याशी संबंधित व्यक्तीचा हा पैसा आहे. अखिलेशजी, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही काळा पैसा नष्ट करण्याचा नाराच दिलेला आहे. आज रेड पडल्याने ते अस्वस्थ आहेत. समाजवादी अत्तर बनविणाऱ्याच्या घरातून अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत, असे शहांनी म्हटले होते.