- पर्जन्यमान : यावर्षी 2166 मिलीमीटर इतका कमी पाऊस
पवनानगर – राज्यात दुष्काळी जिल्हासह सर्वत्र नैऋत्य मोसमी पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वच ठिकाणी कमी पाऊस झाला असल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम टोकावरील कोकणपट्टी लगतला असलेले मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेत 53 टक्के इतका कमी पाऊस झाला आहे. पवना धरण हे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे.
यावर्षी 2 जून रोजी निसर्ग चक्रीवादळा सोबत तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात 334 मिलीमीटर इतका पाऊस झाला. जुलै महिन्यात 268 मिलीमीटर, ऑगस्ट महिन्यात समाधानकारक म्हणजे 1075 मिलिमीटर इतका पाऊस झाला; मात्र 15 ऑगस्टपर्यंत भरणारे पवना धरण यावर्षी भरेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु 9 सप्टेंबरपर्यंत पवना धरण 100 टक्के भरून धरणातून पाणी विसर्ग करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात 110 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यावर्षी पाऊस लांबल्याने ऑक्टोबर महिन्यात 167 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यावर्षी जून ते ऑक्टोबर अखेर 1854 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
याउलट गतवर्षी (2019 मध्ये) 4020 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मागील वर्षीच्या तुलनेत तर यंदा 2166 मिलीमीटर इतका कमी पाऊस झाला आहे. पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा 100 टक्के असून, गेल्यावर्षी ही पवना धरण आजअखेर 100 टक्के भरले होते. यावर्षी निम्म्याने यंदा पाऊस कमी पडला असला तरी शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.