कराची :- इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाला पेप्सीने पुन्हा प्रायोजकत्व दिले आहे. त्यामुळे संघाला एका सामान्य लॉजमध्ये राहण्याच्या नामुष्कीतून पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलमध्ये जाता येणार आहे.
गेली दोन दशके संघाला पेप्सीने प्रायोजकत्व दिले होते. हा करार कंपनीने संपुष्टात आणल्यानंतर पाक संघाला कोणी प्रयोजकत्वच दिले नव्हते. करोनामुळे क्रिकेट ठप्प झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळावर दिवाळखोरीची वेळ आली होती. त्यामुळे इंग्लंडला रवाना झालेल्या संघाला सामान्य लॉजमध्ये मुक्काम करावा लागत होता.
अर्थात, पेप्सीने पुन्हा जरी मंडळाशी करार केला असला तरी त्या रकमेत पूर्वीच्या तुलनेत 40 टक्के कपात करण्यात आली आहे. पेप्सीचा मंडळाशी असलेला करार संपुष्टात आल्यानंतर मंडळाने निविदा काढल्या होत्या. मात्र, करोनामुळे जागतिक उद्योग क्षेत्रालाही फटका बसलेला असल्याने एकही कंपनी पुढे आली नव्हती.
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याच्या सामाजिक संस्थेने पाकिस्तान संघाला सहकार्य केले होते व त्यांच्या संस्थेचा लोगो खेळाडूंना वापरावा लागणार होता. आता पोप्सीने पुन्हा प्रायोजकत्व दिले असून हा नवा करार जून 2021 पर्यंत राहणार आहे. पेप्सीसह इजीपैसा या कंपनीने सहप्रायोजक म्हणून करार केला आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.