आमदार संग्राम थोपटे ः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी
भोर- पुणे-सातारा महामार्गालगत असलेली नसरापूर येथील पशुसंर्वधन विभागाची जागा नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास हस्तांतरीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पशुसंर्वधन मंत्र्यांनी काल घेतला. मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला हा निर्णय झाला असून, आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नाला यासाठी मोठे यश आले असल्याने नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून परिसरातील रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे.
नसरापूर (ता. भोर) येथील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची 40 गुंठे जागा प्राथमिक आरोग्य केंद्रास हस्तांतरीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी (दि. 16) राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली भोर, वेल्हे, मुळशी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला नसरापूर-भोलावडे गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा कॉंग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव माणिकराव गुट्टे, डॉ. एस. एस. राऊतमारे, सहआयुक्त डॉ. शितल मुकणे, सहआयुक्त पशुसंवर्धन विभाग – पुणे डॉ. संतोष पंचपोर, अप्पर सचिव पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे हे यावेळी उपस्थित होते.
ही जागा राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने याचा फायदा अपघातग्रस्त तसेच अन्य प्रवासी यांना देखील होणार आहे. या इमारतीसाठी सुमारे 3 कोटी 71 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता.
पशुसंर्वधन विभागाची जागा प्राथमिक आरोग्य विभागाला हस्तांतरण करण्याचा निर्णय अनेक दिवस प्रलंबित होता, त्यामुळे आरोग्य विभागाची इमारत रखडली होती. मात्र पशुसंर्वधन मंत्री सुनील केदार यांनी निर्णय घेऊन याबाबत हिरवा कंदिला दाखवाल्याने नसरापूर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर गरीब नागरिकांना आणि अपघातग्रस्तांना या आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे.