आज 10 नवे रुग्ण पॉझिटिव्ह ः एकूण रुग्णसंख्या 123
भोर- भोर तालुक्यात करोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, रुग्णसंख्या रोज वाढत आहे. आज (दि. 17) तालुक्यातील 10 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असून, गुरुवारी (दि. 16) एकाचा अहवाल पॅझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील आजपर्यंतचा करोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार करून 123 वर पोहोचला आहे. यातील 66 जणांनी करोनावर मात केली असून, 68 बाधित रुग्णांपैकी भोर येथील कोव्हिड केंद्रात 37, तर पुणे येथे 33 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे व गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
आज (दि. 17) करोना बाधित असल्याच्या आहवालानुसार भाटघर धरणाजवळील संगमनेर येथे 2, पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी येथे 5, वेळू येथे 2, कांजळे येथे 1 आणि पोम्बर्डी येथील 1, अशा 11 बाधित रुग्णांचा समावेश असून, आणखी 5 जणांचे चाचणी अहवाल येणे बाकी असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या गावांत कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला असून, गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी त्या परिसरात भेट देऊन नागरिकांना योग्य त्या उपाययोजनांची माहिती देऊन सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.