विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पर्याय निवडूनही प्रणालीमध्ये त्यांच्या नावे ऑफलाइन
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडूनही त्यांच्या नावावर ऑफलाइन (प्रत्यक्ष) पर्याय निवडल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे ऑनलाइनद्वारे परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
विद्यापीठातर्फे अंतिम वर्षातील नियमित व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने, बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेद्वारे होणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन यातून पर्याय निवडण्याची संधी दिली होती. त्यापैकी 85 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडला. मात्र, काहींनी ऑनलाइन पर्याय निवडूनही प्रणालीमध्ये त्यांच्या नावापुढे ऑफलाइन पर्याय निवडल्याचे दाखवले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला होता. मात्र आता लॉगिनमध्ये ऑफलाइन का दाखवले जात आहे हे कळत नाही. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडून दोनवेळा पडताळणीही केली होती. परीक्षेचे प्रवेशपत्रही डाऊनलोड केले. मात्र आता ऑफलाइन पर्याय निवडल्याचे दिसून येत आहे. असा प्रकार आणखी आठ-दहा विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे. याबाबत महाविद्यालयात चौकशी केली तर विद्यापीठाकडे संपर्क साधा, असे सांगितले जाते. विद्यापीठात संपर्क साधला तर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
विद्यापीठाच्या प्रणालीत चूक नाही…
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक परीक्षा पर्याय अर्ज भरलेला नाही. विद्यापीठाच्या प्रणालीत चूक नाही. अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी इंटरनेट सुविधेसाठी विद्यार्थ्यांना “नॉट ऍप्लिकेबल’ आणि “नो’ हे निवडले असल्यास त्यांना ऑफलाइन परीक्षेसाठी ग्राह्य धरले आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन पर्याय निवडून ऑफलाइन दिसत असलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी 27 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात येत आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.