जुना पशुवैद्यकीय दवाखाना बनलायं अतिक्रमण केंद्र

दिवसा गप्पांचा तर रात्री तळीरामांचा अड्डा

सातारा  – सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीचा राजवाड्यावरील जुना पशुवैद्यकीय दवाखाना रिकामटेकड्यांचे व टपऱ्यांचे अतिक्रमण केंद्र बनले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थावर जिंदगी विभागाने या जागेची मालकी सोडली की त्यांना या जागेचा विसर पडला आहे असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दिवसभर चकाट्या पिटणाऱ्यांचा दिवसा गप्पांचा आणि रात्री तळीरामांचा अड्डा येथे जमू लागल्याने गैरप्रकारांना उत्तेजन मिळू लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा शहराच्या मध्यवर्ती असणारा जुना राजवाडा हे शहराचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र म्हणावे लागेल मात्र, येथील जुन्या वास्तूंना तीर्थरूपांचा सातबारा नावावर असल्याप्रमाणे अतिक्रमणांचा नाट लावणारे बहाद्दर कमी नाहीत. भवानी पेठेतील मंडई स्व. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह व दादामहाराज यांच्या नावाने ओळखली जाते. मात्र या मंडईचा तळमजला ओपन बार झाला आहे. तांदुळ आळीतून चपटीची खरेदी झाल्यावर पार्किंगमधल्या टेम्पोत बसून चकण्याचा स्वाद घेतला जातो.

जिल्हा परिषदेच्या जुना पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात बंद टपऱ्यांच्या आडोशाने हेच उद्योग चालतात. सुमारे दोन एकरामधील या जागेमध्ये सुरू असणारा पशु उपचाराचे हे केंद्र सुविधा आणि मनुष्यबळाअभावी बंद करण्यात आले. आता येथे दिवसा पत्त्यांचे डाव आणि रिकामटेकड्यांचे चांगलेच फावले आहे. राजकीय आश्रयाने याच दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरू झालेल्या चायनीजवर झोकून ताव मारायचा आणि आत निवांतपणे झोप काढायची असा एककलमी कार्यक्रम येथे सुरू असतो. आता तर येणाऱ्या जाणाऱ्या महिला अथवा युवतींना निवांत न्याहाळणाऱ्या बुभुक्षित नजरांचा खेळ ही आता नव्याने सुरू झाला आहे.

संध्याकाळी चौपाटी गजबजायला सुरुवात झाल्यावर रिकामटेकडे रोडरोमिओ येथे सक्रीय होतात काही धूम बायकर्स येथे गुलछबू अंदाजमध्ये येथे उभे असतात. या प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त होण्याची गरज निर्माण झाली आहे. साताऱ्याची जल मंदिर व सुरूची ही दोन सत्ताकेंद्रे येथे हाकेच्या अंतरावर उभी असताना पशुवैद्यकीय दवाखाना मात्र देखभालीअभावी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी अडले अतिक्रमण हटाव मोहिमेचे घोडे

भवानी पेठेत सातारा नगरपालिकेच्या मोकळ्या जागा बळकावून त्यांच्या नावाखाली दलाली लाटणारे पांढरपेशे इथे बरेच आहेत. अतिक्रमणांच्या नावाखाली दोन्ही वाड्यांच्या आडोशाने तुंबडी भरण्याच्या उद्योगांनी येथे कळस गाठला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भिंतीच्या बाहेर तर चायनीज गाडी व पानटपरीचे अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने झाले हे शोधण्यात पालिकेचा शहर विकास विभाग गुंतला आहे. केवळ लोकशाही दिनामध्ये तक्रारी झालेलीच अतिक्रमणे काढायची यामुळे भलताच पायंडा पडायला सुरुवात झाली आहे. मुख्याधिकाऱ्यांचीच इच्छाशक्ती नसल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेचे घोडे अडून बसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)