पुणे – शहरात विविध कारणांनी आत्महत्या करण्याचे प्रकार समोर येत असताना पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे एका ज्येष्ठ महिलेचा जीव वाचला आहे. तातडीने पावले उचलत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने या महिलेचा जीव वाचला. सुनीता गोरे (75, रा. सदाशिव पेठ) असे या महिलेचे नाव आहे.
नाना-नानी पार्कजवळील नदीपात्रामध्ये एक महिला आत्महत्या करण्यासाठी चालली असल्याचा कॉल कंट्रोल रूममध्ये आला. हा कॉल येताच याची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले. पोलीस शिपाई, बीट मार्शल यांचा यात समवेश होता. त्यांनी या महिलेचे समुपदेशन करून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
या महिलेचे नातेवाईक खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आले होते. त्याचवेळेस एक महिला आत्महत्या करण्यास जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत या महिलेचे मतपरिवर्तन केले. त्यानंतर तिला त्यांचे जावई राजेश गोखले यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस शिपाई तळपे, एकशिंगे, जगदाळे, गिऱ्हे, विर, कोल्हे यांच्यासह मार्शल पोलीस शिपाई यादव, ननवरे यांनी ही कामगिरी केली.