ऑफलाइन वेतन घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडीची प्रतीक्षा
पुणे – राज्यातील ऑफलाइन वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जूनअखेर शालार्थ आयडी द्यावेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजाविले आहेत.
1 व 2 जुलै 2016, 19 सप्टेंबर 2016, जानेवारी 2019 च्या शासननिर्णयानुसार 20 टक्के अनुदानास पात्र शाळा व तुकड्यांमधील शिक्षक, कर्मचारी यांना शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाने वारंवार मुदतवाढ दिली आहे. शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून अनेकवेळा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही वर्षभरात 2 हजार 118 शिक्षक, कर्मचारी यांना शालार्थ आयडी दिलेले नाही. क्षेत्रिय स्तरावर समन्वयाने कामकाज होत नसल्याचे दिसून येते.
शासनाकडून यापुढे ऑफलाइन वेतन काढण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे शालार्थ आयडी देण्याची जबाबदारी ही विभागीय शिक्षण उपसंचालकांची आहे. एकही कर्मचारी शालार्थ आयडी विना राहू नये याची दक्षता घ्यावी. अन्यथा शालार्थ आयडीचे काम करणाऱ्या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी आदेश पत्रात नमूद केले आहे.