नोव्हेंबर महिन्यात 635 संशयित रुग्ण आढळले : 219 जणांना डेंग्यूची लागण
पुणे – हिवाळ्याला सुरुवात होवूनही शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरूच आहे. नोव्हेंबरमध्ये 635 संशयित आढळून आले असून, त्यातील 219 जणांना लागण झाली आहे. तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत (दि. 14) 59 जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
पावसाळा सुरू होताच साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होवून डेंग्यू, चिकनगुणिया आणि मलेरियाच्या रुग्णांत वाढ होते. वर्षभरातील सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रूग्ण आढळतात. त्यामध्ये सप्टेंबरमध्ये 1 हजार 630 संशयित आढळून आले. त्यातील 321 रूग्ण डेंग्यूचे होते. तर ऑक्टोबरमध्ये 1 हजार 587 संशयित आढळून आले असून, त्यातील 465 रूग्ण डेंग्यूचे होते. पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात झाल्यावर डेंग्यूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, आजही महिन्याला 100 ते 150 रूग्ण डेंग्यूचे आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ढगाळ वातावरण, थंडी आणि मध्येच ऊन असा विचित्र हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दमा यासह त्वचेच्या समस्या उद्भवत आहेत. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असताना, डेंग्यू आणि चिकनगुणियाचा प्रादुर्भावही सुरूच आहे. नोव्हेंबरमध्ये 219 डेंग्यूचे रूग्ण आढळून आले आहे. तर डिसेंबर महिन्यात 165 संशयित आढळून आले. त्यातील 59 जणांना डेंग्यूची लागण झाली असून, शनिवारी (दि. 14) डेंग्यूचा आणखीन एक रूग्ण आढळून आला आहे. दरम्यान, वर्षभरात 1 हजार 373 व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली आहे.
डासांच्या उत्पत्तीची 2 हजार ठिकाणे आढळली
डेंग्यू, चिकनगुणिया यासारख्या आजारांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. या तपासणीत जानेवारीपासून ते आजपर्यंत डासांच्या उत्पत्तीची 3 हजार 268 ठिकाणे आढळली असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, तसेच दखल न घेणाऱ्या आस्थापनांकडून आतापर्यंत 4 लाख 15 हजार 351 रुपयांचा दंड वसूल केला आहे.