17 हजार 864 बाधित; 87 रुग्णांचा मृत्यू
पुणे – राज्यातील बाधितांची संख्या वाढत असून, परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. गेल्या 24 तासांत 17 हजार 864 बाधित आढळले असून 87 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात एकूणच लॉकडाऊन होण्याची शक्यता या आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या स्तरावर निर्बंध कडक करण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र, संपूर्ण राज्यातच आता कडक निर्बंध लागू करण्यात येण्याची चिन्हे आहेत.
आजपर्यंत 1 कोटी 77 लाख 15 हजार 522 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या आहेत. त्यापैकी 23 लाख 47 हजार 328 बाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यातील 21 लाख 54 हजार 253 बाधित बरे झाले असून, रिकव्हरी रेट 91.77 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 87 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात एकूण 52 हजार 996 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूदरही वाढला असून आजचा मृत्यूदर 2.26 टक्के झाला आहे.
बाधितांमधील 6 लाख 52 हजार 531 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत, 6067 संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
ऍक्टिव्ह रुग्ण वाढता वाढेच…
राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्येने कधीच एक लाखांचा टप्पा पार केला असून, सध्या संपूर्ण राज्यात 1 लाख 38 हजार 813 बाधित ऍक्टिव्ह आहेत. यातही गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्हाच आघाडीवर असून, 28 हजार 817 ऍक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. तर नागपूर, मुंबई, ठाणे येथेही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.