- नवीन 95 रुग्णांची नोंद : 132 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज एक महिन्यानंतर करोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. आज नवीन 95 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 94532 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 95 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील थेरगाव व भोसरी येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील जुन्नर, मुंबई, हिंजवडी व शिरोली येथील 4 जणांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 132 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91276 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1603 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1301 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 841 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 695 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयातून 635 रुग्ण करोनामुक्त
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 635 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, सध्या 30 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. 14) औंध येथील 75 वर्षीय ज्येष्ठाचा करोनाने मृत्यू झाला. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 156 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. 304 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 654 रुग्णांना आत्तापर्यंत होम क्वॉरन्टाइन केले आहे. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 1 हजार 779 रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत.