नवी दिल्ली -देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने रोज चार लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासा देणारी बातमी दिली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्लीसह देशातील एकूण 18 राज्यांमधील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
देशात मंगळवारी गेल्या 14 दिवसांतील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सर्वात कमी आढळून आली. पण अजूनही देशात करोनाचे रोज तीन लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत आहे. त्यातच आरोग्य मंत्रालयाने राज्यांमध्ये करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगण, चंदीगड, लडाख, दमन-दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार यांचा या राज्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.