मंगळवारची स्थिती : “डिस्चार्ज’चे प्रमाण लक्षणीय वाढले
पुणे – शहरातील करोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसांत बाधित संख्या हजाराखाली आली आहे. तर दुसरीकडे दररोज बाराशे ते दोन हजारांच्या जवळपास जण करोनामुक्त होत आहेत. मंगळवारीही 1,240 जण बरे होऊन घरी गेले. दरम्यान, करोनामुळे आणखी 22 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, शहरातील मृतांची एकूण संख्या 1, 593 वर पोहचली आहे.
शहरात संशयितांच्या करोना चाचणीचे प्रमाण वाढले आहे. आता शनिवार- रविवारीही मोठ्या संख्येने तपासणी होत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांचे चित्र पाहिले असता,मागील दोन दिवसांत 1,662 बाधित सापडले. 2,739 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारच्या 924 नव्या बाधितांसह शहरातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 67,651 वर पोहचली असून, त्यातील 51,353 बाधित ठणठणीत झाले आहे. सद्यस्थितीत 14,705 बाधितांपैकी 735 जण अत्यवस्थ आहेत.
आणखी 1 लाख ऍन्टिजेन टेस्ट किट खरेदीस मान्यता
शहरातील संशयितांच्या करोना चाचण्या करण्यासाठी महापालिकेने आणखी 1 लाख किट खरेदीस मान्यता दिली आहे. यापूर्वी सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या किट खरेदी करण्यात आल्या. त्यावेळी सुमारे 503 रुपयांना एक किट घेण्यात आले होते. मात्र, यावेळी निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याने 459 रुपयांना हे किट मिळाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. ऍन्टिजेन टेस्ट किटमध्ये संशयितांची करोना तपासणी अवघ्या अर्ध्या तासात होते. पालिकेने या पूर्वी सुमारे 1 लाख कीट खरेदी केली होती.
त्यावेळी आयसीएमआरने केवळ एकाच कंपनीस मान्यता दिलेली होती, त्यामुळे पालिकेस निविदा काढता आल्या नव्हत्या. मात्र, यावेळी निविदांमध्ये 2 कंपन्या सहभागी झालेल्या होत्या, त्यात, पूर्वी किट पुरविलेल्या कंपनीनेच एक किट 459 रुपयांना देण्याची तयारी दर्शविली आहे.