कराड – गेल्या तीन ते चार दिवसात मलकापूरमध्ये तब्बल 80 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या बाधितांसह शहरात गेल्या अडीच महिन्यात बाधितांचा आकडा सातशेपार गेला आहे. शहरातील रुग्णसंख्या 745 वर पोहचली आहे. यापैकी 510 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 225 ऍक्टिव्ह रुग्णांपैकी 105 जणांना होम आयसोलेशनपध्दतीने उपचार घेत आहेत.
मलकापूर शहरातील करोनाच्या दुसऱ्या टप्प्याला अडीच महिन्यापूर्वी सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात दि. 21 एप्रिलला आगाशिवनगर येथे मलकापुरातील पहिला करोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर एका महिन्यात मलकापुरात 31 जण करोनाबाधित असल्याचे समोर आले. पालिका, शासन व आरोग्य विभागाने करोना लढ्याचे योग्य नियोजन केल्यामुळे आणि योग्य उपचाराने एक महिन्यातच दि. 26 मे रोजी शहरातील सर्व 31 रुग्ण बरे झाल्याने शहर करोनामुक्त झाले होते.
मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर दि. 26 जूनला खंडोबानगरमधे मलकापुरात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला. आणि गेली अडीच महिन्यात करोनाची साखळी वाढतच गेली आहे. शहरात पुन्हा निर्माण झालेल्या साखळ्या थांबता थांबत नाहीत. यावेळी सर्वसामान्य नागरिकांऐवजी विविध शहरातून आलेले प्रवासी, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, बॅक कर्मचारी व त्यांचे निकटसहवासीतच जास्त बाधित आढळत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मंगळवारपर्यंत तीन दिवसात शहरातील विविध कॉलन्यांमधील सुमोर 80 जण करोना पॉझिटिव्ह आहेत.
यामध्ये वयोवृद्धांसह मध्यमवयीन नागरिकांचा समावेश आहे. काही दिवसांत शहरातील नवीनच नागरिक व त्यांचे निकटसहवासित बाधित येत असल्याने करोनाची धास्ती कायम असून रुग्णांची भर पडत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर पालिकेने केलेल्या लॉकडाऊनला मलकापूर वासीयातून प्रतिसाद आहे.