दुकान, कार्यालयात पाचहून जास्त जणांना बंदी

दंडात्मक कारवाई करण्याचा प्रभारी पोलीस अधीक्षकांचा इशारा


18 दिवसांत एक कोटी दहा लाख रुपयांचा दंड वसूल


करोना रोखण्यासाठी मास्क हा एकमेव प्रभावी उपाय 

लोणी काळभोर – पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुठल्याही दुकानात किंवा कार्यालयात पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र आले, तर त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलिसांना दिले आहेत.

विनामास्क घराबाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांबरोबरच, ग्रामीण भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील व्यापारी आस्थापनात पाच अथवा पाचपेक्षा जास्त एकत्र येणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1/3) अंतर्गत दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार, मागील अठरा दिवसांच्या काळात ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्या 51 हजार नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारून, तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा दंडही वसूल केला. नागरिक स्वतःहून काळजी घेत नसल्यानेच, पोलिसांना कठोर कारवाई करण्याची गरज भासत असल्याचेही मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले. 

याबाबत अधिक माहिती देताना प्रभारी पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते म्हणाले, करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर काम करत आहे. करोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मास्कचा वापर हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याने, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. ही कारवाई सुरू असली तरी, अनेक व्यापारी आस्थापनात (खासगी दुकानात) पाच अथवा पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.

रांजणगावात सर्वाधिक दंडवसुली
जिल्ह्यात एकतीस पोलीस ठाणी असून, विनामास्क विरोधातील कारवाईत रांजणगाव पोलीस ठाण्याने सहा लाख रुपयांचा दंड वसूल करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बारामती तालुका पोलीस ठाण्याने पाच लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करून द्वितीय तर लोणावळा शहर पोलिसांनी चार लाख नव्वद हजार रुपयांचा दंड वसूल करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.