नवी दिल्ली – देशातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने घटत असून आज देशातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या केवळ 6 लाख 25 हजारावर आली आहे. एकूण करोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 7.88 टक्के इतकेच आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 36500 नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यानंतर प्रथमच करोना रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण इतके घटले आहे. कमी झालेले नवीन रूग्ण आणि मोठ्या प्रमाणावर बरे होणारे रूग्ण यामुळे देशातील एकूणच करोना स्थितीत लक्षणीय फरक पडल्याचे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.
देशात सध्या जे करोनाग्रस्त आढळून येत आहेत ते फक्त एकूण 18 जिल्ह्यातीलच आहेत. म्हणजेच करोनाग्रस्त भागाचे प्रमाणही सध्या आक्रसत चालले आहे असेहीं आरोग्य मंत्रालयाने निदर्शनाला आणून दिले आहे. गेल्या 24 तासांत 63 हजार 842 रूग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून या राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत 488 करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता एकूण 1लाख 19 हजार 502 इतके झाले आहे.