नगर जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची दीड शतकाकडे वाटचाल

नगर – जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, शेवगाव तालुक्‍यांत पुन्हा करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात काल सायंकाळी सात वाजता 10 करोनाबाधित रुग्ण सापडले असतानाच त्यानंतर पुढील चार तासांत आणखी सहा करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 147 वर पोहोचला असून, करोना पॉझिटिव्ह रुग्णांची दीड शतकाकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईहून अकोले तालुक्‍यातील वाघापूर येथे आलेली 62 वर्षे वयाची महिला बाधित आढळली. घाटकोपर होऊन अकोले तालुक्‍यातील जांभळे येथे आलेला 53 वर्षीय व्यक्ती बाधित झाला. मुंबईहून निमोन (संगमनेर) येथे आलेले 40 वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित झाले आहेत. मुंबईहून शेवगाव तालुक्‍यातील दहिगावने येथे आलेली 60 वर्षीय व्यक्ती बाधित आढळली आहे.

राहाता तालुक्‍यात भीमनगर शिर्डी येथील 60 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात 70 जण करोनामुक्त झाले आहेत. काल कर्जत तालुक्‍यातील राशीन येथील सहा वर्षाची चिमुरडी आणि संगमनेर तालुक्‍यातील नाशिक येथे उपचार घेणारे करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 147 झाली असून संपर्कातील नागरिकांचा प्रशासनाने शोध सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.