सातारा -औद्योगिक व उच्चदाब वीजग्राहक महावितरणसाठी महत्त्वाचे आहेत. करोनाच्या संकटामुळे बंद असलेले उद्योग व मोठे व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत. या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याबरोबर बिलांसंदर्भातील प्रश्न तत्परतेने सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्यानुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, मोठे मॉल्स व व्यावसायिक अशा महत्त्वाच्या वीजग्राहकांशी वेबिनारच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, शिरवळ, कराड येथील 75 ग्राहकांसह पश्चिम महाराष्ट्रातील 920 उद्योजक व महत्त्वाचे ग्राहक सहभागी झाले होते. त्यांच्याशी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संवाद साधला. यात बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सातारचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन ऑफ साताराचे सचिव धैर्यशील भोसले, सातारा एमआयडीसीचे माजी अध्यक्ष भरत शेठ आदी सहभागी झाले होते.
या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती व उद्योग असलेल्या परिसरात विविध योजनांमधून वीज यंत्रणांची झालेली व प्रस्तावित कामे, नवीन वीजदर निश्चितीकरणात उद्योगांसाठीच्या सवलती, स्वतंत्र वेबपोर्टल, ग्राहकसेवा आदींचे सादरीकरण झाले. बिलांची आकारणी, लॉकडाऊनमधील स्थिर आकार व अन्य शंकांचे नाळे यांनी निरसन केले. उद्योजकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठा व बिलांबाबतच्या समस्यांचाही आढावा घेऊन नाळे यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले. महावितरणच्या या उपक्रमाचे उद्योजकांनी स्वागत केले. यापुढे प्रादेशिक कार्यालय स्तरावर दर तीन महिन्यांनी वेबिनारचे आयोजन करून महत्त्वाच्या ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यात येईल, असे नाळे यांनी सांगितले.