एकाच दिवसात तब्बल सतरा बाधित
वेल्हे-वेल्हे तालुक्यात करोनाचा कहर चालूच आहे. तालुक्यात करोनाचे रुग्णांनी शंभरीपार केले असून एकाच दिवसात तब्बल 17 बाधित झाले आहेत. एका दिवसातील एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळणे ही तालुक्यातील पहिलीच वेळ आहे.
साधारण जास्तीत जास्त पाच ते दहा रुग्णांना लागण झाल्याची नोंद होत होती. पावसाळा चालू झाला आणि तालुक्यातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसू लागली.
आरोग्य विभागाकडून अशी लक्षणे असणाऱ्यांचा सर्व्हे चालू झाला. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची माहिती मिळू लागली आहे. तालुक्यातील करोनाग्रस्तांचा वाढत चाललेला आकडा चिंता व्यक्त करणारा आहे. करोनाची साखळी तुटली नाही तर अतिमागास असलेल्या वेल्हे तालुक्याला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
शनिवारी (दि. 25) तालुक्यातील वांजळे 4, वांगणीवाडी 3, दापोडे 3, ओसाडे 3, साईव (पडाळवाडी) 1, निगडे मोसे 2, साखर 1 असे एकूण सतरा जणांना करोनाची लागण झाली असून 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वेल्हे तालुक्यात आतापर्यंत 112 रुग्णांना करोनाची लागण झाली असून 47 जणांनी करोनावर मात केली आहे. 2 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 63 जण उपचार घेत आहेत. तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहून 31 जुलैपर्यंत संचारबंदी राहणार आहे. यामध्ये अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले.