नवी दिल्ली – अमेरिकास्थित ‘शिख फॉर जस्टीस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य गुरपतवंत सिंग पनून आणि कॅनडातील खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर या दोन दहशतवाद्यांची पंजाबमधील स्थावर मालमत्ता राष्ट्रीय तपास संस्थेकडून जप्त केली जाणार आहे. ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली.
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत केंद्र सरकारने पनून याची अमृतसरमधील आणि निज्जरची जालंधरमधील मलमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षी जुलैमध्ये पनून आणि निज्जर यांच्यासह अन्य 7 जणांना बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली दहशतवादी घोषित करण्यात आले होते.
‘शिख फॉर जस्टीस’ आणि ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या दोन्ही स्वतंत्र खलिस्तानवादी संघटना आहेत. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी ‘शिख रेफरेन्डम 2020’नावाखाली सोशल मिडीयावर सुरू केलेल्या अभियानाचा तपास ‘एनआयए’सध्या करत आहे.
या अभियानांतर्गत अमेरिका आणि अन्य काही देशांमध्ये एकत्रीकरण आयोजित करून बेकायदेशीर कृत्यांना चिथावणी देण्याचा उद्योग केला जात आहे.