सातारा (प्रतिनिधी) – करोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांनी सोमवारपासून सातारा शहरात येणारे सातारा- कोरेगाव मार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट व मेढा मार्गावरील मोळाचा ओढा हे दोन रस्ते वगळता इतर सर्व रस्ते बंद केले आहेत. परंतु, सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या बोगदा- कास मार्गावर पोलिस बंदोबस्ताअभावी वाहतूक खुली होती.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागातील परळी खोऱ्यातून बोगदा मार्गावर शहरात येणाऱ्या वाहतुकीस पोलिस यंत्रणेकडून बोगद्याच्या बाहेरच अटकाव केला जात आहे. त्याचबरोबर विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. परंतु, याच ठिकाणी असलेल्या बोगदा- कास मार्गावर बोगद्यात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. परंतु, पोलिस बंदोबस्ताअभावी या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक सुरू होती. बोगदा- कास मार्गावरून जावळी तालुक्यासह महाबळेश्वरला जोडणारे पर्यायी रस्ते असल्याने ही चिंतेची बाब आहे.
बोगद्याकडून कासकडे जाणारा रस्ता पारंबे फाटामार्गे जावळी तालुक्यातील कुसुंबी मुरा, सह्याद्री नगर, धुंद मुरा, निपाणी मुरा, मोळेश्वर, म्हाते मुरा, आपटी मुरा, मांटी यांसह इतर गावांना सातारा शहराशी जोडतो. यातील काही गावेही कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. तर काही गावे कंटेनमेंट झोनच्या आसपासच्या परिसरात आहेत. या ठिकाणचे स्थानिक नागरिक सातारा शहरात ये- जा करण्यासाठी कास रस्त्यावरील पारंबे फाटामार्गे बोगदा असा प्रवास करतात. त्यामुळे बोगदा- कास मार्गावरील बोगद्यात वाहतूकीस मज्जाव करणे अतिशय आवश्यक आहे.
दरम्यान, जावळी तालुक्याबरोबरच कासकडून राजमार्गाने महाबळेश्वरला जाणारा पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून सतर्कतेच्या दृष्टिकोनातून बोगदा- कास मार्गावर देखील पोलिस बंदोबस्त तैनात करून अत्यावश्यक सेवा वगळता या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी होत आहे.
————-