करोनाबाधितांचे उपचार ‘डीपीडीसी’ निधीतून

ग्रामीण भागासह कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना दिलासा

पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीतील तसेच पुणे, देहू आणि खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या हद्दीमधील करोनाबाधित रुग्णांवरील मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या औषधोपचारांचा खर्च जिल्हा नियोजन समितीतील निधीतून करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध प्रतिबंधात्मक व उपचार योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेद्वारेही करोनाबाधित रुग्णांना शासकीय आरोग्य संस्था व खाजगी रुग्णालये-दवाखाने यांच्याद्वारे उपचार देण्यात येत आहेत. तथापि, खासगी रुग्णालये यामधील उपचार खर्चिक व सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांना काही सवलती, मोफत औषधे, मोफत सेवा तसेच अर्थसहाय्य देणे गरजेचे असल्याने मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर (कोविड 19) होणारा औषधोपचाराचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केला जाईल, त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर (कोविड रुग्णांचे काळजी केंद्र), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (समर्पित कोविड आरोग्य केंद्र) आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (समर्पित कोविड रुग्णालय) या संस्थांना औषधोपचारांसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी म्हणाले…
– जे रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांना संबंधित योजनेतील निकषांनुसार लाभ मिळेल.
– ज्या करोनाबाधित रुग्णांचा आरोग्य विमा आहे, त्यांना लाभ मिळतील.
– खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवलेल्या करोनाबाधित रुग्णांना (जे रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, वैयक्तिक आरोग्य विमा योजना या योजनेंगर्तत लाभासाठी पात्र नाहीत) जिल्हा नियोजन समिती अंतर्गतच्या निधीमधून औषधे व तद्‌अनुषंगिक वैद्यकीय साहित्य याबाबतच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.