निगडी, (वार्ताहर) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘चित्रहार’ या सुमधुर हिंदी-मराठी गीतांच्या दृकश्राव्य माध्यमातील मैफिलीने रसिकांना स्मरणरंजनाची अनुभूती प्राप्त झाली. विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी आकुर्डी प्राधिकरणातील गदिमा मिनी थिएटरमध्ये मैफिलीचे आयोजन केले होते.
दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, परमेश्वर घाडगे, विराज कदम, सायली सरोदे उपस्थित होते.
सुजाता माळवे, अनिल जंगम, शुभांगी पवार, शशिकांत नलावडे, दैवशाला घाडगे, माधव पावगी, संध्या मोरे, अरुण सरमाने, विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे या गायक कलाकारांनी अवीट गोडीच्या एकल आणि विशेषतः युगुलगीतांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना जुन्या काळात नेले. गीतांचे सादरीकरण होत असताना पार्श्वभूमीवरील पटलावर त्या चित्रपटातील दृश्ये, मूळ गायक, गीतकार, संगीतकार यांचा तपशील रसिकांच्या असंख्य जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.
गणेशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. किसी नजर को तेरा…, ये मैंने कसम ली…, जब दीप जले आना…, ले चल मुझे… या युगुलगीतांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली. सा रे ग म प म्युझिकल इव्हेंटच्या शैलेश घावटे यांनी तांत्रिक साहाय्य केले. अरुण सरमाने, सानिका कांबळे आणि शुभांगी पवार यांनी मैफिलीचे निवेदन केले.