सदरबझार परिसरातून संशयितास अटक
सातारा – बंडगार्डन (पुणे) येथील चप्पल व्यावसायिक चंदन कृपालदास शेवानी यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी संशयित किरण सुनील कदम (वय 21, चिंचकर निवास, अष्टविनायक कॉलनी, हडपसर, पुणे, मूळ रा. मालगाव, ता. सातारा) याला पोलिसांनी काल (दि. 5) रात्री सदरबझार परिसरातून ताब्यात घेतले. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शेवानी यांचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची कबुली त्याने चौकशीत दिली आहे.
या प्रकरणात आणखी तिघांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बंडगार्डन येथून अपहरण करण्यात आलेले व्यापारी चंदन कृपालदास शेवानी यांचा मृतदेह 5 जानेवारी रोजी पाडेगाव, ता. फलटण येथील कालव्याजवळ सापडला होता. शेवानी यांचा गोळ्या घालून खून करण्या आला होता. या गुन्ह्यातील एका संशयिताला पकडून सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
या गुन्ह्यातील दुसरा संशयित किरण कदम हा साताऱ्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतून देण्यात आली होती. सातपुते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पोवई नाका व सदरबझार येथे दोन स्वतंत्र पथके तैनात केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना जिल्हा बॅंकेच्या शाखेसमोर मोबाइल शॉपीलगत एक जण तोंडाला रुमाल लावून संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, या गुन्ह्यातील सहभागाची कबुली त्याने दिली.
आपण व चार साथीदारांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शेवानी यांचा गोळ्या घालून खून केल्याचे त्याने सांगितले. किरण कदमला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट दोनच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, जोतिराम बर्गे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, केतन शिंदे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी ही कारवाई केली.