शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक प्रकरण : निर्बंध घातल्यावर काढले सव्वादोन कोटी
पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद आमदार अनिल भोसले (वय 55, रा. बाणेर रस्ता) यांच्यासह चौघांची रवानगी विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी येरवडा कारागृहात केली आहे.
बॅंकेचे संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ आणि मुख्य लेखापाल शैलेश भोसले अशी काराग़ृहात रवानगी केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव, नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गैरव्यवहार झाल्याचा एकूण आकडा 153 कोटी 50 लाखांपर्यंत गेला आहे. आरोपींचे बॅंक खाते, मालमत्तेचा तपास करण्यासाठी, संबंधित रक्कम व गुन्ह्यांच्या अनुषंगाने कागदपत्रे जप्त करण्यासाठी संबंधितांना तीन दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी केली होती. बचाव पक्षातर्फे ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. एस. के. जैन, ऍड. बिपिन पाटोळे, ऍड. ऋषिकेश गानू, ऍड. शिवम निंबाळकर, ऍड. विराज पाटोळे आणि ऍड. यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली.
आमदार भोसले यांना घरचे जेवण, औषधे
अनिल भोसले यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना औषधे आणि घरचे जेवण मिळण्याबाबतचा अर्ज ऍड. शिवम निंबाळकर यांनी केला होता. त्यानुसार तुरुंगातील डॉक्टरांनी औषधे तपासून सुरू ठेवावीत आणि घरचे जेवण देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.