शिरवळ – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या बाहेर पुणे बाजूकडे असलेल्या “एस’ आकाराच्या वळणावर बोअरवेलचा भरधाव ट्रक आज सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात रघुराय रावत व गोविंद रावत (रा. मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सेंथिलकुमार गोंडल (रा. पदुपल्ली यामपट्टी, ता. तिरछीगडू, जि. नामकल, तमिळनाडू, हल्ली रा. कोडोली, सातारा) यांच्या मालकीचा बोअरवेलचा ट्रक (एमएच-11-एएल-4466) घेऊन चालक सैलादुराई साडैयाईन हा खंडाळ्याकडे निघाला होता. ट्रकमध्ये बोअलवेल मशीन, लोखंडी अवजड पाइप व इतर साहित्य होते. व्यकंटेशन लक्ष्मण (वय 45, रा. नवीन एमआयडीसी, कोडोली, सातारा, मूळ रा. किरीपट्टी, ता. आतूर, जि. सेलम, तमिळनाडू), मुस्तफा, खंबाटकीत दोन कामगार ठार कालिमत्तूर पेरीयन्ना, पोनूस्वामी (रा. तमिळनाडू), रघुराय रावत, गोविंद रावत, प्रमोदकुमार सिंह (रा. मध्य प्रदेश), जंगलू धन्नू सलाम, विठ्ठल नरसिंग बुगा (रा. धनोरा, गडचिरोली), बाबुलाल हरिवंश यादव (रा. घोडधर, मध्य प्रदेश), केशव राजपती सिंग (रा. कुरसा, मध्य प्रदेश) हे कामगार होते.
भरधाव वेगात असलेला ट्रक खंबाटकी बोगद्याच्या पुढे पुणे बाजूकडे असलेल्या “एस’ आकाराच्या वळणावर आज सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास उलटून रस्त्याकडेला असलेल्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकला. या अपघातात रघुराय व गोविंद रावत यांचा मृत्यू झाला तर बारा कामगार जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. याबाबत व्यकंटेशन लक्ष्मण यांनी खंडाळा
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रकमालक सेंथिलकुमार गोंडल व चालक सैलादुराई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करत आहेत.