जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामाला सुरुवात
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च केल्यानंतरही यंदाच्या पावसाळ्यात शहरातील मुख्य रस्त्यासंह विविध भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. आता पाऊस थांबल्यानंतर शहरातील काही मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडला आहे. शनिवारी शहरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी ते मोरवाडी चौकादरम्यानचे खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे, मागील काही दिवसांपासून खड्ड्यामुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर मागील काही महिन्यापासून खड्ड्याचे साम्राज्य झाले होते. विशेष म्हणजे महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही अवघ्या काही दिवसाताच शहरातील मुख्य रस्त्यासह विविध भागातील बहुतांश रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले होते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे, वाहनधारकांतून महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत होतो. शहरातील प्रमुख मार्ग म्हणून ओळख असणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मोरवाडी चौक ते बोपाडीपर्यंत जुन्या मुंबई -पुणे महार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यातच या महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे अडचणीत आणखी भर पडली होती. त्यामुळे, दुचाकीचालकापासून मोठ्या वाहन धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
याबाबत दैनिक “प्रभात’ ने सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजीच्या अंकात “कोट्यावधी रुपयांचा चुराडा, तरीही खड्ड्यांचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महापालिका सत्ताधारी व प्रशासन खडबडून जागे झाले असून शनिवारी बोपोडी ते मोरवाडी चौकादरम्यान खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
उपनगरांची दुरावस्था कधी दूर होणार?
मुख्य शहराच्या तुलनेत उपनगरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. चांगले रस्ते खोदून तसेच सोडून दिले असल्याने रस्त्यांची तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या जागेची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस थांबलेला असून चांगले ऊन पडत असतानाही अजूनही उपनगरांमध्ये रस्त्यांच्या कडेला चिखल, साचलेले पाणी आणि घाण दिसून येत आहे.