सातारा – ग्रेड सेपरेटरच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची सफाई मोहिम पालिकेकडून धडाक्यात सुरू आहे. बुधवारी रविवार पेठेतील बालाजी प्राईड इमारतीचा पार्किंग रॅंम्प पालिकेने जमीनदोस्त केला. या कारवाईमुळे परिसरातील आठ मीटरचा सेवा रस्ता मोकळा झाला आहे.
शाहू चौक ते पोवई नाका या दरम्यानच्या ग्रेड सेपरेटरचे भुयारा अंर्तगत काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. ग्रेड सेपरेटरच्या वरील दर्शनी भागात रस्त्याच्या खडीकरणाची व डांबरीकरणाची कामे सध्या प्रगतीपथावर सुरु असून या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांना हटवण्याची मोहिम सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. मेळवणे कोल्ड्रिंक्स व कबाडी पावभाजी दुकानांच्या फरशीचे बांधकाम हटवण्यात आले.
या रस्त्याच्या रुंदीकरणात “फ्रिअर छत्र’ या ऐतिहासिक पाराचा अडथळा येत आहे. या पाराच्या चिरांचा केवळ पहिला थर हटवला जाणार आहे. मात्र कर्मवीर पाराचे कथित लेबल चिटकवून काही जणांनी अतिक्रमण मोहिम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पारावर असणाऱ्या 1853 च्या दगडी कोनशिलेमुळे पाराचा वेगळेपणा सिध्द झाला आहे.
त्यामुळे पालिकेच्या शहर विकास विभागाने पाराचे अतिक्रमण सोडून बालाजी प्राईड इमारतीचा पार्किंग रॅंम्प उद्ध्वस्त केला. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी अतिक्रमण मोहिम राबवत प्राईड इमारतीच्या रस्त्याच्या बाजूचा रुंदीकरणात अडथळा ठरणारा रॅंम्प जेसीबीने हटविला. रॅम्पवरची वाहने पालिकेच्या आवाहनानुसार काढून घेण्यात आली. 166 ते 171 रविवार पेठ या पाच गट क्रमांकातील छोटी मोठी नऊ अतिक्रमणेही पालिकेच्यावतीने हटवण्यात आली. सयाजीराव विद्यालय ते लोणार गल्ली कॉर्नरचा रस्ता खुला करण्यात आला आहे.
अतिक्रमण हटाव मोहिम थांबणार नाही
लोणार गल्ली ते शिवाजी सर्कल या दरम्यान आठ मीटरच्या सेवा रस्त्यात जी अतिक्रमणे येतील ती हटवली जातील असा इशारा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिला. फ्रिअर छत्राच्या पाराचा एक चिरांचा टप्पा जेसीबीने हटवला जाणार आहे. मात्र पाराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मात्र अतिक्रमण मोहिम कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही असा इशारा गोरे यांनी दिला आहे.