पिंपरी – हरिनामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केला आणि सूंपर्ण वातावरण भारावून गेले. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणाऱ्या भाविकांना पाहून महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी देखील स्वतःला रोखू शकले नाहीत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि प्रदीप जांभळे-पाटील यांनीदेखील या सोहळ्यात सहभाग नोंदवत “ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ च्या जयघोषावर ठेका धरला.
लाखो भाविकांच्या मुखातून होणाऱ्या हरिनामाच्या गजराने भक्तीरसात पिंपरी-चिंचवडकर न्हाऊन निघाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखीचे निगडी येथे दुपारी स्वागत करण्यात आले.
यावेळी स्वागताला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. या स्वागतादरम्यान या प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील हरिनामाच्या जयघोषावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.