- दोघांकडून सहा पिस्तूल जप्त
- गुन्हे शाखेच्या युनिट चारची कारवाई
- 15 काडतूसही केली हस्तगत
पिंपरी – मोटारीच्या बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या आणि परळी वैजनाथ येथे वसुलीचे काम करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा पिस्तूल आणि 15 काडतूसही जप्त केले आहेत.
गणेश मारुती साळी (वय 26, रा. जुनी सांगवी), ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गित्ते (वय 30, रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी काळेवाडीत सापळा रचून गणेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस तसेच पिस्तूल सारखे दिसणारे ‘लाइटर’ मिळून आले.
आरोपी गणेशकडे चौकशी केली असता त्याने परळी येथील ग्यानोबा याच्याकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी परळी येथून ग्यानोबाला अटक केली. ग्यानोबावर परळी शहर, परळी ग्रामीण, युसूफ वडगाव, रेणापूर लातूर, शिवाजीनगर पुणे, स्वारगेट पुणे आदी पोलीस ठाण्यात खून, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, वाहन चोरी असे तब्बल 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ग्यानोबाने मध्यप्रदेशातील कालू सिंग जसवंत सिंग याच्याकडून पिस्तूल, गावठी कट्टा जिवंत काडतूस विकत घेतल्याचे सांगितले. त्यातील दोन पिस्तूल आणि दोन काडतूस गणेश याला विकले आणि अन्य विक्रीसाठी लपवून ठेवले. पोलिसांनी एक लाख 64 हजार रुपयांचे सहा पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसे व पिस्तूल सारखे दिसणारे लायटर जप्त केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरिष देशमुख, कर्मचारी वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, संजय गवारे, नारायण जाधव, प्रवीण दळे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, तुषार शेटे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.
शहरातील बाउन्सरचे रेकॉर्ड तपासणार – पोलीस आयुक्त
शहरात कार्यरत असलेल्या विविध सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व बाउन्सरचे आणि वसूलीचे काम करणाऱ्यांचे संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. सर्व बाउन्सरचे रेकॉर्ड काढून ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे आहेत, त्यांच्यावर कारवाईचे संकेतही पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले.
पोलीस आयुक्तांनीही घेतला करोना धसका
गुन्हे शाखेने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आयुक्तांच्या कक्षात पत्रकार परिषद होणार होती. मात्र करोनाच्या धसक्याने आयुक्त कक्षाऐवजी भर उन्हात पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी घेतला