नवी दिल्ली – भारताचा सलामीवीर फलंदाज व उपकर्णधार रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावण्याची क्षमता असलेला एकमेव फलंदाज आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू ब्रॅड हॉग याने रोहितचे कौतुक केले आहे.
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांत पहिल्यांदा द्विशतक केले, त्यानंतर अनेक फलंदाजांनी ही कामगिरी केली मात्र त्यातही रोहितचेच नाव अग्रेसर आहे, कारण त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनवेळा द्विशतक फटकावले. त्याने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली, त्यावेळी जर त्याला आणखी 15-20 चेंडू खेळायला मिळाले असते तर त्याने त्रिशतक देखील साकार केले असते. मोठा डाव खेळण्याची ती देखील कमीत कमी चेंडूत शतकी पल्ला गाठण्याची त्याची क्षमता अचाट आहे.
रोहितने कसोटीत द्विशतक केले, एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतके केली आता केवळ टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक करायचे बाकी आहे. तो हे देखील सहज करू शकतो, असेही हॉगने व्यक्त केले.
टी-20 च्या एका सामन्यात एका डावात साधारणपणे 120 चेंडू खेळायला मिळतात, त्यातही रोहित सलामीवीर फलंदाज असल्याने त्याला पूर्ण षटकांच्या निम्मी षटके खेळून 60 चेंडू मिळाले तरीही त्यात तो द्विशतकी टप्पा गाठू शकतो, मला माहीत आहे की हे अविश्वसनीय आहे, मात्र रोहितने अशा अविश्वसनीय खेळ्या यापूर्वी अनेकदा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने असाच चमत्कार करत तीन द्विशतक केली त्यापूर्वीही कोणी अशी कामगिरी करेल असा विश्वास कोणालाही नव्हता, त्यामुळे रोहितने टी-20 मध्ये द्विशतक केले तरी मला अजिबात धक्का बसणार नाही, असेही हॉगने स्पष्ट केले.
कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या क्रिकेटच्या तीनही प्रकारात रोहितने शतके फटकावली आहेत. टी-20 मध्ये 4 शतके करणारा रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे. तो जेव्हा भरात असतो, तेव्हा कोणत्याही गोलंदाजावर वर्चस्व राखतो, तसेच कोणत्याही चेंडूवर षटकार फटकावतो. त्याची क्षमता अफलातून आहे. त्याने ठरविले तर त्याला काहीही शक्य आहे, असेही हॉगने सांगितले.