पुणे : आयपीएलचा लिलाव हा मैदानावर रंगणार्या सामन्यांइतकाच रोमांचक असतो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत, आयपीएल लिलावाने क्रिकेटच्या खेळाला काही सर्वात रोमांचक आणि सुंदर गोष्टी दिल्या आहेत. क्षणात करोडपती झालेल्या अनोळखी चेहर्यांपासून ते न विकल्या गेलेल्या मोठ्या नावांपर्यंत, आयपीएलच्या शेवटच्या 13 लिलावात हे सर्व पाहायला मिळाले.
आयपीएल 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलचा 15 व्या हंगामात यंदा 10 संंघ असणार आहेत. ज्यामध्ये तब्बल 74 सामने खेळले जातील. सर्व 10 संघांनी लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या खेळाडूंची संख्या जाहीर केली आहे.
केएल राहुलला लखनौ फ्रँचायझीने 17 कोटी रुपयांत करारबद्ध केले आहे. यासह तो विराट कोहलीसह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. या लेखात, आम्ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंवर एक नजर टाकणार आहोत.
केएल राहुल : 17 कोटी, लखनऊ सुपरजायंट्स (2022)
यंदाच्या आयपीएल लिलावापूर्वी पंजाब किंग्सने सलामीवीर केएल राहुलला करारमुक्त केल्यानंतर यंदा नव्याने समाविष्ठ झालेल्या लखनऊ सुपरजायंट्सने राहुलला लिलावापूर्वीच तब्बल 17 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले. यासह केएल राहुल आणि विराट कोहलीबरोबर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
राहुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या 95 सामन्यांत 47.43 च्या सरासरीने 3273 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहली : 17 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (2018)
माजी कर्णधार विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2018 च्या मेगा लिलावापूर्वी 17 कोटींमध्ये संघात कायम ठेवले होते. यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. विराटने 2012 ते 2021 पर्यंत आरसीबीचे नेतृत्व केले होते. यामध्ये त्याने आपल्या संघाला दोन वेळा अंतिम फेरीत पोहचवले मात्र विजेतेपद जिंकण्यात तो अपयशी ठरला. आयपीएल 2021 नंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे. असे असले तरी कारकिर्दीच्या शेवटपर्यंत बंगळुरुकडूनच खेळणार असल्याचे विराटने जाहिर केले आहे.
ख्रिस मॉरिस : 16.5 कोटी, राजस्थान रॉयल्स (2021)
राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला 2021 च्या आयपीएल लिलावात तब्बल 16.5 कोटींमध्ये खरेदी केले. यासह मॉरिस त्या वर्षीचा सर्वात खेळाडू ठरला. असे असले तरी मॉरिसला राजस्थानसाठी काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने त्याला मेगा लिलावापूर्वी करारमुक्त केले. त्यानंतर, मॉरिसने जानेवारी 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली आहे.
युवराज सिंग : 16 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (2015)
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 2015 मध्ये 16 कोटी रुपये खर्च केले होते. त्यापूर्वी आरसीबीने आयपीएल 2014 मध्ये युवराजला 14 कोटी रुपयांत करारबद्ध केले होते. तर 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला सात कोटींना खरेदी केले. केवळ तीन आयपीएल हंगामात, युवराज सिंगने आयपीएलमधून 37 कोटी रुपये मिळवले होते. आयपीएलमधील एकूण 84.60 कोटी मानधनासह युवराज आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणार्या खेळाडूंच्या यादीत 8व्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा : 16 कोटी, मुंबई इंडियन्स (2022)
मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल खिताब जिंकणार्या रोहित शर्माला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने 16 कोटींमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित व्यतिरिक्त मुंबईने जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी) आणि किरॉन पोलार्ड (6 कोटी) यांना कायम ठेवले आहे. आयपीएल 2022 मध्ये तो पाच आयपीएल विजेतेपदांमध्ये आणखी भर घालण्यासाठी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल.