नाशिक – नाशिक जिल्ह्यातून दु:खद बातमी समोर आली आहे. ट्रेकिंगला गेलेल्या दोन ट्रेकर्सचा तोल गेल्यामुळे सुमारे 120 वीस फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. ट्रेकिंगला गेलेले इतर 12 जण सुखरूप आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहमदनगहून 15 जणांचा ग्रुप मनमाडच्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मयूर दत्तात्रय म्हस्के व अनिल शिवाजी वाघ असे दरीत कोसळून मृत्यू झालेल्या ट्रेकर्सची नावे असून प्रशांत पवार जखमी झालेल्या ट्रेकर्सचे नाव आहे. मनमाडमध्ये थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर अहमदनगर मधून इंद्रप्रस्थ ट्रेकर्सचा ग्रुप ट्रेकिंगसाठी आला होता. या ग्रुपमध्ये 8 मुली व 7 मुलांचा समावेश होता.
मयूर व अनिल या दोघांनी वर चढण्यासाठी जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्वजण शेंडीच्या डोंगरावर चढले.परंतु परतीच्या मार्गावर असताना यातील काहीजण खाली उतरले. दरम्यान पाठीमागे थांबलेले मयूर व अनिल या दोघांचा बोल्डिंगमधून रोप काढत असताना अपघात झाला. यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला.