भोर -तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांच्या शालांत परीक्षेच्या टक्केवारीत यावर्षी 10.78 टक्क्यांनी वाढ झाली असून तालुक्यातील 50 माध्यमिक विद्यालयांपैकी 29 विद्यालयांचा निकाल 100 टक्के, तर 19 विद्यालयांचा निकाल 90 टक्के लागला आहे. केवळ दोन विद्यालयांचा निकाल 85 टक्क्यांपर्यंतच लागलेला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.
गतवर्षी तालुक्याचा 87 टक्के लागलेला होता. यावर्षी मात्र विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली आहे. भोर तालुक्यातून 2 हजार 214 विद्यार्थी बसले होते. त्या पैकी 887 विद्यार्थ्यांनी डिसिंटक्शन मिळवले असून 803 विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली आहे. 426 विद्यार्थी ब श्रेणीत व अवघ्या 49 विद्यार्थ्यांना पासक्लास मिळाला आहे. भोर शहरात सध्या कडक लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल वेळेत मिळावा यासाठी भोर येथील रोबोकॉंब या एमएसआयटी केंद्रा मार्फत विद्यार्थ्यांना घरपोच निकाल देण्याची व्यवस्था केल्याने निकाल पाहण्यासाठी भोरमध्ये कोठेही गर्दी झाली नव्हती.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा – राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल भोर, रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी, कान्होजी जेधे विद्यालय कारी, घेवडेश्वर विद्यालय महुडे, आप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे, संत लिंगनाथस्वामी विद्यालय भोंगवली, रायरेश्वर विद्यालय टिटेघर, दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी, येसाजी कंक विद्यालय करंदी-वाढाणे, सद्गुरू नारायणमहाराज विद्यालय नारायणपूर, पालसिद्धेश्वर विद्यालय पाले.
याचबरोबर पंचक्रोशी विद्यालय नेरे, शिवाजी विद्यालय नसरापूर, न्यू इंग्लिश स्कूल न्हावी, वीर बाजी प्रभू विद्यालय शिंदे, पिसावारे विद्यालय, पसुरे विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वरवे, न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली, रायरी विद्यालय रायरी, कुरंजाई विद्यालय कुरगवडी, शासकीय आश्रमशाळा पांगारी, आश्रमशाळा कुरुंजी, विजय मुकुंदराव विद्यालय माळेगाव, समर्थ विद्यालय केळवडे, अमृतराव बांदल विद्यालय सांगवी- येवली, बारे विद्यालय बारे बु., समर्थ विद्या मंदिर वेळवंड, अमृता विद्यालय नसरापूर व कृष्णाई इंग्लिश मीडियम स्कूल चिखलावडे. उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा निकाल 98.37 ते 79.72 टक्क्यांदरम्यान लागला आहे.