सातारा -सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकाच वेळी नऊ करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने शाहूपुरीकरांची धास्ती वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून बाधितांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शाहूपुरीतील बाधितांची साखळी तोडण्यासाठी सतर्कता गरजेची बनली आहे.
शहरालगतची मोठी ग्रामपंचायत म्हणून शाहूपुरी ग्रामपंचायतीची ओळख आहे. दिवसेंदिवस या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात असताना शाहूपुरीत मात्र रुग्णसंख्या कमी होती. समता पार्क, शिवाजीनगर, दौलतनगर, तामजाईनगर, रेणुका सोसायटी, भैरोबा पायथा, सर्वोदय कॉलनी आदी परिसरात रुग्ण आढळून आले होते.
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रुग्णांची साखळी तोडण्यात यश आले होते. मात्र, मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात शाहूपुरी हद्दीत आणखी नऊ बाधितांची भर पडली आहे. गुलमोहर कॉलनीमध्ये यापूर्वी चार बाधित आढळून आले होते. त्यांच्या निकट सहवासातील आणखी 3 बाधित आज आले आहेत. गुलमोहर कॉलनीलगत अथर्व अपार्टमेंट येथे एक बाधित, समता पार्क येथे एक युवक, दत्तछाया कॉलनीत एक, भैरवनाथ कॉलनी (तामजाईनगर), रामकुंड येथे एक आणि सर्वोदय कॉलनीत एक बाधित वाढला आहे.
शाहूपुरीत एकाच वेळी नऊ बाधित आढळल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश आरडे, सदस्य राजेंद्र मोहिते, ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले आहे. शाहूपुरीत आज नव्याने पाच झोन वाढले आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायतीने करोनाच्या कालावधीत गांभीर्यपूर्वक पावले उचलली आहेत. ग्रामस्थांमध्ये करोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांची ग्रामपंचायत काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहऱ्यावर मास्क वापरावे, हाताला सॅनेटायझर लावावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
– मोहन कोळी
(ग्रामविकास अधिकारी, शाहूपुरी)