प्रत्येकाची स्वॅब टेस्ट अशक्य : आरोग्य विभागाचा पवित्रा
प्रशासन म्हणते, “खबरदारी हाच उपाय’; मग करोनाचे वाहक सोडणे गुन्हा नाही का?
पुणे – परप्रांतियांना पाठवताना त्यांची वैद्यकीय तपासणी करणार, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी स्पष्ट केले. पण, ही तपासणी म्हणजे किरकोळ आरोग्य तपासणी असणार आहे. यात प्रत्येकाची स्वॅब टेस्ट अशक्य आहे, असा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे हा सारा प्रकार म्हणजे हजारो लोकांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिवाय “सेफ झोन’ही “डेंजर झोन’मध्ये जाण्याचा धोका आहे.
परप्रांतियांना मूळ गावी पाठविण्याबाबत सरकारने नुकताच आदेश दिला आहे. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी केली. मात्र, ही गर्दी कळत-नकळत त्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्याचे काम करत आहे. गेल्या 24 तासांत रेडझोनसह ऑरेंज आणि ग्रीनझोनमधील पोलीस ठाणे हद्दीत ही गर्दी दिसत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही रुग्ण सापडला नाही, तेथे संसर्गाचा धोका आहे. दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा केली असता, या परप्रांतीयांची आरोग्य तपासणी कशी केली जाणार, त्यांनी कोठे आरोग्य तपासणी करावी, संभाव्य धोका टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली.
“प्रत्येक व्यक्तीची करोना स्वॅब टेस्ट अशक्य आहे. गावी जाणाऱ्यांची फक्त क्लिनिकल तपासणी (उदा. सर्दी, ताप, खोकला किंवा करोनासंदर्भात लक्षणे दिसत नाही ना?) करण्यात येणार आहे. ही तपासणी कोणत्याही रुग्णालयात केली तरी चालणार असून, त्यासाठी गर्दी करू नये, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नांदेड येथे अडकलेल्या भाविकांची क्लिनिकल तपासणी करून त्यांना पंजाब येथे पाठविण्यात आले.
मात्र, पोहचल्यानंतर पुन्हा तपासणी केली असता, त्यातील अनेकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले. थोडक्यात, या परप्रांतियांना पाठविणे म्हणजेच एका जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यात करोना घेऊन जाणे असेच होणार आहे. त्याबाबत आरोग्य विभागाने सांगितले की, “करोनाची लक्षणे लगेच दिसतील असे नाही. त्यामुळे आज स्वॅब तपासणी केली आणि अहवाल निगेटिव्ह आला, तरी अनेक व्यक्ती इंक्युबेशन पिरेडमध्ये असतात. त्यामुळे इतरत्र गेल्यानंतर सात दिवसांनी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घेणे हाच पर्याय आहे.’
दरम्यान, असे जर असेल तर करोनाचे हे संभाव्य वाहक झापडबंद पद्धतीने अन्यत्र पाठवणे गुन्हा ठरत नाही का? याचे उत्तर कोणी द्यायचे, हादेखील प्रश्नच आहे.