कोलकाता – देशात सुरू असलेल्या इंधन दरवाढीचा पश्चिम बंगालमधील मजूरमंत्री बेचाराम मन्ना यांनी आज आगळ्या पद्धतीने निषेध केला. त्यांनी हुगळी जिल्ह्यातील घरापासून कोलकातापर्यंत 38 किमीचा प्रवास सायकलवरून करून या इंधनदरवाढीचा निषेध नोंदवला.
मन्ना हे सिंगूरचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या अन्य सहकारी कार्यकर्त्यांसमवेत ही यात्रा करून ते मंत्रालयात पोहोचले. सध्या पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे.
सकाळी 8 वाजता ते घरातून सायकलवर निघाले आणि साडे बाराच्या सुमाराला ते कोलकाता विधानसभेच्या ठिकाणी पोहोचले. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या राजवटीत इंधनदरवाढीने कळस केला आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर शंभर रुपयांच्यावर गेला आहे. हे सारे सहन करण्याच्या पलीकडे चालले आहे असे ते म्हणाले. सर्व शक्य त्या मार्गाने मोदी सरकारने सामान्य माणसाला छळण्याचेच काम केले आहे, असे ते म्हणाले.