मंचर, दि. 12 (प्रतिनिधी) -भिवंडी येथील पाया गावातून 27 प्रवासी घेऊन भीमाशंकरला देवदर्शनाकरिता निघालेल्या खासगी मिनी बसला घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी येथे बुधवारी (दि. 12) पहाटे 6:30 च्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत बस, पूर्णपणे जळून खाक झाली असून, बसची कागदपत्रे, प्रवाशांचे साहित्यही जळाले आहे. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी, चालक-वाहक सर्वजण सुखरूप आहेत.
याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू बसप्पा सुरपूर (वय 30, रा. कल्याण-डोंबिवली, ठाणे) हा मंगळवारी (दि. 11) रात्री साडेअकराच्या सुमारास मिनी बसने (एमएच 05 डीके 9699) भिंवडी येथील पाया गावातील 27 प्रवासी घेऊन भीमाशंकर येथे देवदर्शनाकरिता चालले होते. बुधवारी सकाळी 6:30 वाजता घोडेगाव-भीमाशंकर जाणाऱ्या रस्त्यावर शिंदेवाडी येथे बस आली असता बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान ओळखून बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही आग कशामुळे लागली याची माहिती पोलीस घेत असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. याबाबत बसचालक बाबू सुरपूर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास सहायक फौजदार वायाळ करत आहे.
प्रवाशानेच केला 112 ला फोन
प्रवासी चंद्रशेखर गोपाळ घोलप यांनी डायल 112 ला संपर्क करून पोलिसांना बस पेटल्याची माहिती दिली. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.